Monday, August 16, 2010

कथा "भायखळा मार्केट' नावाच्या श्रमिक संस्कृतीची


कथा "भायखळा मार्केट' नावाच्या श्रमिक संस्कृतीची

नितीन चव्हाण
मुंबईतील पहिली भाजीपाला मंडई म्हणून नावलौकिक असलेल्या ऐतिहासिक "भायखळा मार्केट'चा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी सोहळा साजरा झाला. मुंबईच्या श्रमिक संस्कृतीशी एकरूप झालेल्या या मार्केटशी संबंधित राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासावर टाकलेला हा प्रकाशझोत...

मुंबईतील एक भाजीपाल्याचे मार्केट आणि त्याचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाशी संबंध... ही काय भानगड आहे... अशी विचारणा कदाचित "शहरीबाबू' करतील; पण हा भाजीपाला व्यवसाय आणि त्याचे मार्केट हे मुंबईच्या इतिहासाचे व त्यातील सामाजिक स्थित्यंतराचे साक्षीदार ठरते, तेव्हा भल्याभल्यांची बोटे तोंडात जातील, असा इतिहास आहे. ही कथा आहे "भायखळा मार्केट' नावाच्या श्रमिक संस्कृतीची... या मार्केटला तब्बल 150 वर्षे पूर्ण झाली आहेत.मुंबईच्या औद्योगिक आणि व्यापारी वृद्धीमुळे या शहरात ग्रामीण भागातून भारतातून जे नागरिक आले त्यांच्यासाठी भाजीपाला या शेतीमालाची निकड व व्यवसायाची गरज यामुळे आसपासच्या जमिनींमध्ये वाड्यांच्या स्वरूपात भाजीपाला लागवडीला ब्रिटिशांनी प्रोत्साहन दिले. भाजीपाल्याच्या या वाड्या करण्यासाठी जुन्नर भागातून नाणेघाटमार्गे अनेक कुटुंबे मुंबईत आली. त्यामध्ये जुन्नर मेहेर पिंपळगावचे वऱ्हाडी, येणेरेचे भुजबळ, चवरे, बोडके, उदापूरचे शिंदे, बागलोहरचे नाईक अशी कुटुंबे मुंबईत स्थायिक झाली. ही कुटुंबे भाजीपाला लागवड करून भुलेश्‍वर मार्केट, फोर्ट मार्केट, चर्नी रोड येथे स्वतः भाजीविक्री करीत असत. 1853 मध्ये भायखळा स्टेशनहून ठाण्यास पहिली रेल्वे धावली आणि भाजीपाला व्यवसायाचे मार्केट भायखळ्यास होण्यास एक प्रकारे मदतच झाली. ब्रिटिशांनी राणीच्या बागेच्या समोरील सुमारे तीन ते चार एकर जागा कै. धोंडिबा कृष्णाजी मेहेर यांना मार्केटसाठी दिली. मेहेर कुटुंबीयांची खासगी मालमत्ता म्हणून "मेहेर मार्केट' ओळखले जाणारे तेच हे आज "भायखळा मार्केट' म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईतील भाजीपाल्याची ही पहिली मंडई. भायखळा भाजीबाजार किंवा मेहेर मार्केट हे मुंबईतील भाजीपाला व्यवसायाचे एकमेव केंद्र होते. अनेक ऐतिहासिक घटनांचे हे मार्केट साक्षीदार आहे. 1882 मध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर यांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर डोंगरी येथून वाजतगाजत मिरवणूक काढल्यानंतर याच मार्केटमध्ये त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. 1885 मध्ये जोतिराव फुले यांना "महात्मा' ही पदवी देण्यात आली. त्या वेळी या मंडईतील व्यापारी मांडवी कोळीवाडा येथे झालेल्या शिवनेर सभागृहातील समारंभाला हजर होते, अशी मुंबईच्या गौरवशाली इतिहासात नोंद आहे.
डॉ. आंबेडकरांचे लग्न आणि "शिवचरित्र' संकल्प
1907 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह सोहळा याच मंडईत झाला. डॉ. आंबेडकर यांना लग्नासाठी जागा मिळेना, म्हणून कै. धोंडिबा मेहेर यांचे वंशज सबाजीशेठ मेहेर यांनी स्वतःचे मार्केट लग्न समारंभासाठी उपलब्ध करून दिले होते. 1951 ते 1954 या काळात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना "शिवचरित्र' प्रकाशित करायचे होते. त्या वेळी पैसे कमी पडत असल्याने पुण्याच्या हडपसर भाजीबाजारातून कोथिंबीर आणून भायखळ्याच्या मार्केटमध्ये विक्रीचा व्यवसाय केला. बाबासाहेबांच्याच शब्दांत सांगायचे, तर ""भायखळा स्टेशनवरून मार्केटपर्यंत कोथिंबिरीचे ओझे मी डोक्‍यावरूनच वाहून नेत असे. एका विशिष्ट जागी कोथिंबिरीची विक्री करण्यास उभा राहत असे. सगळा माल खरोखरच विकला जाई. किमतही भरपूर येत असे. दीड-दोन तासांत मी पुण्याची ट्रेन पकडत असे. पुण्यात आल्यावर दुपारी जेवणखाण उरकून पुन्हा सायकलने हडपसर भाजीबाजाराकडे मी निघे. या धावपळीत विश्रांती आणि झोप फार कमी मिळायची. कष्ट खूप व्हायचे; पण पैसे चांगले मिळायचे. तब्बल दहा महिने हा व्यवसाय केला. पुढे अन्य मार्गाने मला पैशांची मदत मिळाली आणि माझे संकल्पित "शिवचरित्र'चे स्वप्न पूर्ण झाले...'

'संयुक्त महाराष्ट्र चळवळ
कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे या मार्केटशी जोडलेले होते. स्वातंत्र्याच्या चळवळीपासून अस्पृश्‍यांच्या मुक्तीच्या चळवळीपर्यंत अनेक घटनांची ही वास्तू साक्षीदार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होत असत. त्यांना सर्वप्रकारचे सहकार्य मार्केटमधील व्यापारी करीत असत. स्वातंत्र्यसैनिकांचे निरोप फळ-भाज्यांच्या करंड्यातून लपवून दिले जात असत. 1942 मध्ये मुंबई कॉंग्रेस कमिटीवर बंदी आली असताना कमिटीची सर्व कागदपत्रे मेहेर मार्केटमध्ये गुप्तपणे ठेवण्यात आली होती. 1962 मध्ये भारत-चीन युद्धात भारतीय सैनिकांना मुंबईतून मदत करणाऱ्यांमध्ये भायखळा मंडई प्रथम क्रमांकावर होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी हे मार्केट जोडले गेले असून, या मंडईतील कामगार भाऊसाहेब कोंडिबा भास्कर हे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हुतात्मा झाल्याची नोंद आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि या मार्केटशी आपल्या जीवनाशी नाळ जुळलेले छगन भुजबळ आणि त्यांचे लहान भाऊ मगन भुजबळ यांचे लहानपण याच मार्केटमध्ये भाजीपाला विक्री करण्यात गेले. भुजबळांचे आजोबा यशवंतराव भुजबळ यांची जुन्नर येथे शेती होती. शेतीमध्ये भाजीपाला पिकवून ते मार्केटमध्ये विकण्यासाठी आणत असत. त्यांचा या मार्केटमध्ये किरकोळ विक्रीचा गाळा होता. त्यांच्यानंतर भुजबळ यांचे वडील चंद्रकांत आणि आई चंद्रभागाबाई यांनी उपजीविकेचे साधन म्हणून हा गाळा चालविला.
भाजीविक्रेताही शेअरहोल्डर झाला
1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेने हे मार्केट विकत घेण्याचा ठराव केला. त्याकाळी संघटना कॉंग्रेसमध्ये असलेले कै. मुकुंदराव पाटील, कॉंग्रेसचे बी. डी. झुटे व शिवसेनेत असलेले छगन भुजबळ यांना ही बाब समजली. त्यांनी हे मार्केट सहकारी तत्त्वावर विकत घ्यायचे ठरविले. बाजाराचे मालक शंकर नानाजी मेहेर यांनीही या प्रस्तावाला आनंदाने संमती दिली आणि 27 मे 1989 रोजी 60 लाख रुपयांना हे मार्केट सहकारी तत्त्वावर विकत घेण्यात आले. मार्केटमध्ये पालेभाजी, कोथिंबीर, लिंबू, मिरची विकणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्त्री-पुरुष व्यापाऱ्यांपासून आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आडते व खरेदीदार व गरीब आडतदार होते. या सर्वांना सामावून घेण्याचे काम व्यापारी संघाने केले. 333 विक्रेत्यांना सभासद करून घेण्यात आले व "भायखळा मार्केट को. ऑप. प्रिमायसेस सोसायटी' स्थापन करण्यात आली. प्रत्येक सभासदाला 500 रुपये शेअर देऊन सभासदांना समान हक्क देण्यात आला. सामान्य भाजीविक्रेतेही मार्केटचे शेअरहोल्डर झाले.19 फेब्रुवारी 1996 रोजी मुंबईतील सर्वच मंडयांचे व्यवहार राज्य सरकारने वाशी मार्केट येथे हलविले. त्याचा परिणाम या मंडईवरही झाला; पण देशातील भाजी व्यवसायातील अग्रगण्य मंडई म्हणून या मंडईची नोंद इतिहासात नक्कीच घेतली जाईल इतका देदीप्यमान वैभवशाली वारसा या मार्केटच्या पुण्याईशी जोडला आहे.

No comments:

Post a Comment