Thursday, June 24, 2010

अब्दुस सत्तार दळवी

ज्येष्ठ उर्दू साहित्यिक, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अब्दुस सत्तार दळवी यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्ली येथील "गालीब इन्स्टिट्यूट'चा मिर्झा गालीब पुरस्कार जाहीर झाला आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते दिल्लीत 11 डिसेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त उर्दू-मराठी भाषाभगिनींच्या आदान-प्रदान प्रक्रियेविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद... मराठी विश्‍वाचे आर्त उर्दू मनी प्रकाशलेभाषा दोन संस्कृतींना जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नव्हे... भाषिक संस्काराचा हा बंधुभाव सध्याच्या जात-पात, भाषा-प्रांताच्या नावावर चाललेल्या राजकारणात लोप पावत चालला आहे. त्यातही काही माणसे पणती हाती घेऊन भाषाभगिनींत दाटणाऱ्या अंधाराला प्रकाशाच्या वाटा दाखवित असतात. भाषेचा सृजन सोहळा जपत असतात. ज्येष्ठ उर्दू साहित्यिक डॉ. अब्दुस सत्तार दळवी हे त्यापैकी एक आहेत. गेली पाच दशके त्यांनी मराठीतील अभिजात म्हणता येतील अशी काही पुस्तके उर्दूत नेऊन ज्ञानोबा-तुकोबांच्या मराठी विश्‍वाचे आर्त उर्दूच्या मनी प्रकाशून टाकले आहे.डॉ. दळवी हे कोकणातल्या दापोलीजवळच्या दाभिळ गावचे. उर्दू आणि मराठी ही त्यांची मातृभाषा. कोकणातील बोलीवर "दखनी उर्दू'चा प्रभाव असल्याने दळवींवर उर्दूसोबत दापोली भागातील "बाणकोटी' बोलीचेही संस्कार झाले. या भाषक संकरातून निर्माण झालेल्या "उर्दू-कोकणी' भाषेतील त्यांचे संवाद ऐकणे म्हणजे एक मस्त मैफल असते. त्यात कोकणातील जीवनपद्धती येते. भाषक-धार्मिक संस्कार येतात. गावदेवाची जत्रा येते, उरूस येतो आणि संदलचा ताबूतही नाचत येतो. कुलकर्ण्यांच्या घरातील लग्नाची गोष्ट आणि तांबोळी, दळवी, हुसेन यांच्या "निकाह'तील "बारात'ही येते.1962 मध्ये "अंजुमन इस्लाम'च्या उर्दू इन्स्टिट्यूटमध्ये "उर्दू-दखनी'वरील व्याख्यानमालेत ख्यातनाम इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी यांचे भाषण होते. आपल्या भाषणात पगडी यांनी "उर्दूतून मराठीत बरेचसे साहित्य आले, मात्र मराठीतून उर्दूत फारसे गेलेले नाही' अशी खंत व्यक्त केली. पगडींच्या या वाक्‍याचा डॉ. दळवींवर प्रभाव पडला. त्यांनी मुंबईत जामा मशिदीच्या ग्रंथालयात जाऊन दर्जेदार उर्दू साहित्याचा शोध घेतला असता त्यांना 1750 मध्ये प्रसिद्ध झालेली शाह तुराब चिश्‍ती यांची रामदास स्वामींच्या "मनाचे श्‍लोक'ची "मन समझावन' ही मराठीतून उर्दूत अनुवाद केलेली प्रत सापडली. हा ग्रंथ वाचून त्यांनी रामदास आणि रामदासी परंपरा, रामदासांची काव्ये, समकालीन संतकाव्ये यांचा अभ्यास करून "मन समझावन'ची नवीन संपादित आवृत्ती 1964 मध्ये प्रकाशित केली. हा ग्रंथ पाहून पगडी यांनी डॉ. दळवींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत भाषा आदान-प्रदानाची ही प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यास सांगितले. पगडी यांच्या शाबासकीने माझा आत्मविश्‍वास दुणावल्याचे डॉ. दळवी सांगतात."ईस्माईल युसुफ'मध्ये शिक्षण घेत असताना पु. शि. रेगे हे आमचे प्राचार्य होते. त्यांच्या "सावित्री' कादंबरीला उर्दूत नेण्याची त्यांनी परवानगी दिली. पुढे त्याच्या "अवलोकिता' या आणखी एका कादंबरीचा अनुवाद मी केला. वसंत बापट यांना हे समजताच त्यांनी विश्राम बेडेकरांच्या "रणांगण'चा अनुवाद का करीत नाहीस असे मला खडसावले. बापटसरांचा आदेश शिरसांवद्य मानीत "रणांगण'ही पूर्ण झाले. ही कांदबरी अनुवादित करताना उर्दू वाचकांना कादंबरीतील सौंदर्यस्थळे, बॉब-हार्टाची हळुवार प्रेमकहाणी समजावून देणे ही कसोटी होती. मात्र उर्दू भाषेला नैसर्गिकच काव्यात्मक लय व आदबशीर नजाकत असल्याने अनुवाद करणे कठीण गेले नाही. ख्यातनाम उर्दू शायर कवी इक्‍बाल यांनी "जावेदनामा' या आध्यात्मिक अनुभूती देणाऱ्या पर्शियन ग्रंथात "जन्नत'मध्ये संस्कृतचे भाष्यकार "भृतहरी' भेटत असल्याचा संदर्भ दिला आहे. भृतहरींच्या विद्वत्तेने भारावून गेलेल्या डॉ. दळवी यांनी भृतहरींच्या अभिजाततेचा शोध घेत निवडक 200 श्‍लोकांचा अनुवाद केला. त्याला भाषाशास्त्राच्या अभ्यासात मास्टरपीस म्हणून मान्यता मिळाली आहे.संत ज्ञानेश्‍वर आणि त्यांची काव्यरचना जगभरातील सर्वभाषक अभ्यासकांना खुणावत असते. डॉ. दळवींना ज्ञानेश्‍वरांच्या "पसायदान'मध्ये कुराणातील साम्यस्थळे आढळली. विश्‍वाचे आर्त सांगणाऱ्या सर्व धर्मांच्या समानतेचे गोडवे गाणाऱ्या "पसायदान'ला त्यांनी उर्दूत नेले. उर्दूत त्यानंतर "पसायदान'वर अनेक मान्यवरांनी लिहिले. अली सरदार जाफरी यांनीही दळवींच्या या प्रयत्नाला आपने बहुत बडा काम किया है... अशी मनसोक्त दाद दिली. दळवींनी 1962-63 मध्ये लंडनला जाऊन ध्वनीशास्त्र व भाषाशास्त्राचा अभ्यास केला. भारतात परत आल्यानंतर भाषाशास्त्रावर पीएचडी केली. उर्दू भाषा आणि सामाजिक संदर्भ, भाषकीय संशोधन ही दोन पुस्तके लिहिली. भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये उर्दूत एम.ए.ला अभ्यासग्रंथ म्हणून हे पुस्तक लावण्यात आले आहे. "पुण्याचे मुसलमान', "कोकणातील मुसलमान' या स्वतंत्र पुस्तकांतून त्यांनी मुस्लिमांचे शिक्षण, ग्रंथवाचन, राहणीमान, जीवनपद्धती, मुशायरे, साहित्य, चित्रपटसृष्टी असा विविधांगी वेध घेतला आहे. जयवंत दळवींचे "बॅरिस्टर', कुसुमाग्रजांची "वीज म्हणाली धरतीला'चे त्यांचे अनुवाद चर्चेत राहिले आहेत. "बॉम्बे की उर्दू'मधून त्यांनी "बम्बैया पर्शियन उर्दू'वर प्रकाश टाकला आहे. उर्दूतील नवीन साहित्य निर्मितीबद्दल मात्र डॉ. दळवी तितकेसे समाधानी नाहीत. नव्या पिढीतील लेखकांचा कल शायरी आणि लघुकथांकडे अधिक असल्याचे मत ते व्यक्त करतात. सामाजिक, ऐतिहासिक, भाषाशास्त्र, तत्त्वज्ञान अशा गंभीर विषयांकडे ते मोठ्या प्रमाणात वळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सध्याच्या भाषा-प्रांतवादाच्या राजकारणावर दळवी यांच्यातील लेखक अस्वस्थ होते. ते म्हणतात भाषेच्या नावाखाली चाललेले हे प्रकार दुदैवी आहेत. भाषा हे संवादाचे माध्यम आहे वादाचे नव्हे. भाषेवरून चालणारा संघर्ष म्हणजे गर्मी जादा है रोशनी कम है... या वर्गातला आहे. आपण जर्मन, फ्रेन्च भाषा आपण शिकतो पण मुलांना मराठी शाळेत घालण्याची आपल्याला लाज वाटते. दुसऱ्यांच्या भाषा शिकल्याच पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या मातृभाषेचा मात्र विसर पडता कामा नये अशा अधिकारवाणीने ते सांगायला विसरत नाहीत.