Sunday, July 25, 2010

ग्रंथसंपदेसाठी "त्यांनी' पुन्हा घेतली उभारी...

नितीन चव्हाण
ग्रंथ हेच दैवत मानून एखाद्या व्रतस्थाप्रमाणे त्यांची पूजा त्यांनी बांधली होती... आयुष्यभराची सारी मिळकत त्यात ओतली... प्रसंगी पोटाला चिमटा काढून मोठी ग्रंथसंपदा उभी केली... आपल्या स्वप्नाचे सार्थक झाल्याचे वाटत असतानाच मुंबईतील "26 जुलै'च्या पावसाने त्यावर शब्दशः पाणी फेरले... ज्यासाठी आजवर खस्ता खाल्ल्या, तो पुस्तकांचा ठेवाच मातीमोल होतानाचे दुःस्वप्न त्यांना पाहावे लागले... रमेश शिंदे हे त्यांचे नाव. आपण एक लढाई हरतोय, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा उभारी घेत, या पुस्तकांना नवसंजीवनी देण्यासाठी ते सज्ज झाले आहेत... गोरेगाव पश्‍चिमेकडील मोतीलालनगर क्रमांक एकमध्ये राहाणारे रमेश शिंदे आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांच्या संग्रहात इसवीसन 1800 पासूनच्या दोनशे वर्षांतील असंख्य दुर्मिळ पुस्तके, देश-विदेशातील नामवंत लेखक, अभ्यासक, संशोधकांचे ग्रंथ आहेत. सहा ते सात हजार ग्रंथांचा हा ठेवा त्यांनी 50 वर्षे जीवापाड जपला. तीन वर्षांपूर्वी 26 जुलैच्या पावसात तो जवळपास होत्याचा नव्हता झाला. गोरेगावच्या चाळीतील शिंदे यांच्या बैठ्या घरात पावसाचे पाणी दहा-बारा फुटांच्या वर चढले आणि हा संग्रह त्या तडाख्यात सापडला. कथा-कादंबरी, कवितांच्या काल्पनिक जगात रमण्यापेक्षा प्रखर बुद्धिवादाच्या कसोटीवर घासून लखलखीत झालेल्या वैचारिक ग्रंथसंपदेचा ध्यास श्री. शिंदे यांनी घेतला होता. डॉ. आंबेडकरांच्या खासगी संग्रहातील त्यांच्या स्वाक्षऱ्या असलेली असंख्य पुस्तके त्यांच्या संग्रहात आहेत. बाबासाहेबांनी संपादन केलेल्या "प्रबुद्ध भारत', "मूकनायक' यांसह "विविध ज्ञानविस्तार'पासून शंभर वर्षांतील अभ्यासनीय मासिके, विशेषांक, वृत्तपत्रांच्या फायली पावसाच्या तडाख्यात सापडल्या. श्री. शिंदे यांच्या या ग्रंथालयाचा देश-विदेशांतील असंख्य अभ्यासकांना संशोधनासाठी, "पीएचडी'साठी वापर करता आला. ""दुर्दैवाने मला हा संग्रह डोळ्यादेखत पाण्यात जाताना पाहावे लागले. पुढे महिनाभर ते दृष्य वारंवार नजरेसमोर येत होते. अन्नपाणी गोड लागत नव्हते. झोपही उडाली होती...'' रमेश शिंदे सांगत होते. ते पुढे म्हणाले, "शक्‍य तितकी पुस्तके वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न घरच्यांनी केला. ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांना ही बाब कळताच त्यांनी पुस्तकांची व्यवस्था करण्यासाठी त्वरित एक टेम्पो पाठवून दिला. भिजलेली पुस्तके सुकविण्यासाठी केशव गोरे ट्रस्टच्या बाजूला अंबामाता मंदिरात जागा उपलब्ध करून दिली. तिथे महिनाभर हॅलोजनच्या झोताखाली पुस्तके सुकत होती. त्यातील जवळपास एक हजार पुस्तकांचा अक्षरशः लगदा झाला. उरलेल्या पुस्तकांची स्थिती म्हणावी तितकी धड नाही. अनेकांची मुखपृष्ठे बाद झाली, तर काहींची पाने निखळली आहेत. यातील असंख्य पुस्तकांना बाइंडिंग करायचे आहे. मला जमेल तशी काही बाइंडिंग करून घेतली. मात्र, त्याचा खर्च मोठा आहे. माझ्यासारख्याला तो परवडणारा नाही.' या पुस्तकांचे "मायक्रोफिल्मिंग' करून घेतल्यास तरुण पिढीतील अभ्यासकांना त्याचा वापर करता येईल. त्या दृष्टीने काही करता येईल काय, याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment