Monday, August 16, 2010
कथा "भायखळा मार्केट' नावाच्या श्रमिक संस्कृतीची
कथा "भायखळा मार्केट' नावाच्या श्रमिक संस्कृतीची
नितीन चव्हाण
मुंबईतील पहिली भाजीपाला मंडई म्हणून नावलौकिक असलेल्या ऐतिहासिक "भायखळा मार्केट'चा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी सोहळा साजरा झाला. मुंबईच्या श्रमिक संस्कृतीशी एकरूप झालेल्या या मार्केटशी संबंधित राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासावर टाकलेला हा प्रकाशझोत...
मुंबईतील एक भाजीपाल्याचे मार्केट आणि त्याचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाशी संबंध... ही काय भानगड आहे... अशी विचारणा कदाचित "शहरीबाबू' करतील; पण हा भाजीपाला व्यवसाय आणि त्याचे मार्केट हे मुंबईच्या इतिहासाचे व त्यातील सामाजिक स्थित्यंतराचे साक्षीदार ठरते, तेव्हा भल्याभल्यांची बोटे तोंडात जातील, असा इतिहास आहे. ही कथा आहे "भायखळा मार्केट' नावाच्या श्रमिक संस्कृतीची... या मार्केटला तब्बल 150 वर्षे पूर्ण झाली आहेत.मुंबईच्या औद्योगिक आणि व्यापारी वृद्धीमुळे या शहरात ग्रामीण भागातून भारतातून जे नागरिक आले त्यांच्यासाठी भाजीपाला या शेतीमालाची निकड व व्यवसायाची गरज यामुळे आसपासच्या जमिनींमध्ये वाड्यांच्या स्वरूपात भाजीपाला लागवडीला ब्रिटिशांनी प्रोत्साहन दिले. भाजीपाल्याच्या या वाड्या करण्यासाठी जुन्नर भागातून नाणेघाटमार्गे अनेक कुटुंबे मुंबईत आली. त्यामध्ये जुन्नर मेहेर पिंपळगावचे वऱ्हाडी, येणेरेचे भुजबळ, चवरे, बोडके, उदापूरचे शिंदे, बागलोहरचे नाईक अशी कुटुंबे मुंबईत स्थायिक झाली. ही कुटुंबे भाजीपाला लागवड करून भुलेश्वर मार्केट, फोर्ट मार्केट, चर्नी रोड येथे स्वतः भाजीविक्री करीत असत. 1853 मध्ये भायखळा स्टेशनहून ठाण्यास पहिली रेल्वे धावली आणि भाजीपाला व्यवसायाचे मार्केट भायखळ्यास होण्यास एक प्रकारे मदतच झाली. ब्रिटिशांनी राणीच्या बागेच्या समोरील सुमारे तीन ते चार एकर जागा कै. धोंडिबा कृष्णाजी मेहेर यांना मार्केटसाठी दिली. मेहेर कुटुंबीयांची खासगी मालमत्ता म्हणून "मेहेर मार्केट' ओळखले जाणारे तेच हे आज "भायखळा मार्केट' म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईतील भाजीपाल्याची ही पहिली मंडई. भायखळा भाजीबाजार किंवा मेहेर मार्केट हे मुंबईतील भाजीपाला व्यवसायाचे एकमेव केंद्र होते. अनेक ऐतिहासिक घटनांचे हे मार्केट साक्षीदार आहे. 1882 मध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर यांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर डोंगरी येथून वाजतगाजत मिरवणूक काढल्यानंतर याच मार्केटमध्ये त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. 1885 मध्ये जोतिराव फुले यांना "महात्मा' ही पदवी देण्यात आली. त्या वेळी या मंडईतील व्यापारी मांडवी कोळीवाडा येथे झालेल्या शिवनेर सभागृहातील समारंभाला हजर होते, अशी मुंबईच्या गौरवशाली इतिहासात नोंद आहे.
डॉ. आंबेडकरांचे लग्न आणि "शिवचरित्र' संकल्प
1907 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह सोहळा याच मंडईत झाला. डॉ. आंबेडकर यांना लग्नासाठी जागा मिळेना, म्हणून कै. धोंडिबा मेहेर यांचे वंशज सबाजीशेठ मेहेर यांनी स्वतःचे मार्केट लग्न समारंभासाठी उपलब्ध करून दिले होते. 1951 ते 1954 या काळात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना "शिवचरित्र' प्रकाशित करायचे होते. त्या वेळी पैसे कमी पडत असल्याने पुण्याच्या हडपसर भाजीबाजारातून कोथिंबीर आणून भायखळ्याच्या मार्केटमध्ये विक्रीचा व्यवसाय केला. बाबासाहेबांच्याच शब्दांत सांगायचे, तर ""भायखळा स्टेशनवरून मार्केटपर्यंत कोथिंबिरीचे ओझे मी डोक्यावरूनच वाहून नेत असे. एका विशिष्ट जागी कोथिंबिरीची विक्री करण्यास उभा राहत असे. सगळा माल खरोखरच विकला जाई. किमतही भरपूर येत असे. दीड-दोन तासांत मी पुण्याची ट्रेन पकडत असे. पुण्यात आल्यावर दुपारी जेवणखाण उरकून पुन्हा सायकलने हडपसर भाजीबाजाराकडे मी निघे. या धावपळीत विश्रांती आणि झोप फार कमी मिळायची. कष्ट खूप व्हायचे; पण पैसे चांगले मिळायचे. तब्बल दहा महिने हा व्यवसाय केला. पुढे अन्य मार्गाने मला पैशांची मदत मिळाली आणि माझे संकल्पित "शिवचरित्र'चे स्वप्न पूर्ण झाले...'
'संयुक्त महाराष्ट्र चळवळ
कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे या मार्केटशी जोडलेले होते. स्वातंत्र्याच्या चळवळीपासून अस्पृश्यांच्या मुक्तीच्या चळवळीपर्यंत अनेक घटनांची ही वास्तू साक्षीदार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होत असत. त्यांना सर्वप्रकारचे सहकार्य मार्केटमधील व्यापारी करीत असत. स्वातंत्र्यसैनिकांचे निरोप फळ-भाज्यांच्या करंड्यातून लपवून दिले जात असत. 1942 मध्ये मुंबई कॉंग्रेस कमिटीवर बंदी आली असताना कमिटीची सर्व कागदपत्रे मेहेर मार्केटमध्ये गुप्तपणे ठेवण्यात आली होती. 1962 मध्ये भारत-चीन युद्धात भारतीय सैनिकांना मुंबईतून मदत करणाऱ्यांमध्ये भायखळा मंडई प्रथम क्रमांकावर होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी हे मार्केट जोडले गेले असून, या मंडईतील कामगार भाऊसाहेब कोंडिबा भास्कर हे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हुतात्मा झाल्याची नोंद आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि या मार्केटशी आपल्या जीवनाशी नाळ जुळलेले छगन भुजबळ आणि त्यांचे लहान भाऊ मगन भुजबळ यांचे लहानपण याच मार्केटमध्ये भाजीपाला विक्री करण्यात गेले. भुजबळांचे आजोबा यशवंतराव भुजबळ यांची जुन्नर येथे शेती होती. शेतीमध्ये भाजीपाला पिकवून ते मार्केटमध्ये विकण्यासाठी आणत असत. त्यांचा या मार्केटमध्ये किरकोळ विक्रीचा गाळा होता. त्यांच्यानंतर भुजबळ यांचे वडील चंद्रकांत आणि आई चंद्रभागाबाई यांनी उपजीविकेचे साधन म्हणून हा गाळा चालविला.
भाजीविक्रेताही शेअरहोल्डर झाला
1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेने हे मार्केट विकत घेण्याचा ठराव केला. त्याकाळी संघटना कॉंग्रेसमध्ये असलेले कै. मुकुंदराव पाटील, कॉंग्रेसचे बी. डी. झुटे व शिवसेनेत असलेले छगन भुजबळ यांना ही बाब समजली. त्यांनी हे मार्केट सहकारी तत्त्वावर विकत घ्यायचे ठरविले. बाजाराचे मालक शंकर नानाजी मेहेर यांनीही या प्रस्तावाला आनंदाने संमती दिली आणि 27 मे 1989 रोजी 60 लाख रुपयांना हे मार्केट सहकारी तत्त्वावर विकत घेण्यात आले. मार्केटमध्ये पालेभाजी, कोथिंबीर, लिंबू, मिरची विकणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्त्री-पुरुष व्यापाऱ्यांपासून आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आडते व खरेदीदार व गरीब आडतदार होते. या सर्वांना सामावून घेण्याचे काम व्यापारी संघाने केले. 333 विक्रेत्यांना सभासद करून घेण्यात आले व "भायखळा मार्केट को. ऑप. प्रिमायसेस सोसायटी' स्थापन करण्यात आली. प्रत्येक सभासदाला 500 रुपये शेअर देऊन सभासदांना समान हक्क देण्यात आला. सामान्य भाजीविक्रेतेही मार्केटचे शेअरहोल्डर झाले.19 फेब्रुवारी 1996 रोजी मुंबईतील सर्वच मंडयांचे व्यवहार राज्य सरकारने वाशी मार्केट येथे हलविले. त्याचा परिणाम या मंडईवरही झाला; पण देशातील भाजी व्यवसायातील अग्रगण्य मंडई म्हणून या मंडईची नोंद इतिहासात नक्कीच घेतली जाईल इतका देदीप्यमान वैभवशाली वारसा या मार्केटच्या पुण्याईशी जोडला आहे.
Monday, July 26, 2010
nete bhetti navyane...
नेते भेटती नव्याने... बाकी जुनेच आहे...!
शिवसेनेने शिववडा आणला म्हणून कॉंग्रेसने कांदेपोहे पुढे केले. त्यानंतर आता मनसेने बेरोजगारांसाठी 25 हजार स्टॉलची योजना महापालिकडे सादर केली आहे. राजकीय पक्षांची वैचारिक दिवाळखोरी कशी चालली आहे, याची ही गेल्या वर्षभरातील काही ठळक उदाहरणे आहेत. बेरोजगार तरुणांना कधीच पूर्ण न होणारी रोजगाराची स्वप्ने दाखवायची आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे हे प्रकार आहेत. मतांच्या राजकारणात तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सुरू असलेल्या या सवंग घोषणांच्या पलीकडे राजकीय पक्ष कधी जाणार, असा प्रश्न आहे. शिवसेनेने दीड वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत शिववडापाव स्टॉलची योजना जाहीर केली. पिझ्झा-बर्गर या परदेशी ब्रॅण्डला शिववडा हा "देशी' ब्रॅण्ड टक्कर देईल, अशा गर्जना झाल्या. लोकसभा-विधानसभा निवडणुकांचा मोसम असल्याने प्रचारासाठी त्याचा चांगला वापरही झाला. शिवाजी पार्कवर मोठे संमेलन भरविले गेले. वडा आणि त्याची झणझणीत चटणी सर्वत्र एकाच प्रकारची असावी यासाठी स्पर्धाही घेण्यात आली. पालिकेत असलेल्या सत्तेच्या जोरावर आपण ही योजना पूर्णत्वास नेऊ, अशा राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा झाल्या. पालिका सभागृहात प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मीडियासमोर "शिववडा' हाती घेत "सेलिब्रेशन'ही करण्यात आले. निव्वळ प्रसिद्धीच्या थाटामाटात या योजनेचे तीनतेरा शिवसेनेनेच वाजविले आहेत.मुंबईच्या भागाभागात फिरत्या गाड्यांवरून शिववड्याची विक्री होईल असे सुरुवातीला जाहीर केले. नंतर योजनेचे "सरकारीकरण' करण्यासाठी ही योजना पालिकेच्या माथी मारण्यात आली. त्यासाठी जागांचा शोध पालिकेने सुरू केला; परंतु जागाच शिल्लक नसल्याने ही योजना राबविण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविली. वास्तविक मुंबईतील फुटपाथवरची इंच इंच जागा परप्रांतीय फेरीवाले पटकावत असताना शिवसेनेच्या एकाही नेत्याने आमच्या स्टॉलसाठी तुमच्याकडे जागा कशी मिळत नाही, असे साध्या शब्दानेही पालिकेला खडसावले नाही. पालिकेतील शिवसेनेचे कारभारी आणि शिववड्याचे प्रणेते असलेले नेते महाभारतातील "संजया'प्रमाणे ही योजना पालिका मंजूर करील अशी "दूरदृष्टी' लावून बसले. योजनेला प्रशासकीय गती मिळवून देण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळवून देणारी ही चांगली योजना शिवसेना नेत्यांच्या नाकर्तेपणामुळेच फसली.शिवसेनेच्या शिववड्याचे असे "भजे' झाले असताना कॉंग्रेसने कांदेपोह्यांची योजना आणली. योजना, तिचे स्वरूप याचा कोणताही प्रस्ताव तयार न करता केवळ मीडियामध्ये चमकून घेण्याची हौस कॉंग्रेसने भागवून घेतली. प्रसिद्धी आणि शिवसेनेला डिवचण्यापलीकडे कॉंग्रेसने यातून काहीही साध्य केले नाही. त्यानंतर आता आली आहे मनसेची योजना. वास्तविक ही योजना मुंबै बॅंकेची. या बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर हे मनसेचे आमदार आहेत. या योजनेचा बॅंकेकडून पालिकेकडे प्रस्ताव आला असता तर कदाचित मीडियाने त्याची तितकीशी दखलही घेतली नसती. मात्र स्वतः राज ठाकरे योजना घेऊन आल्याने मीडियाचा "फ्लॅश' चकाकला. फुटपाथवर स्टॉलसाठी जागा देण्याची ही मागणी पालिकेला परवडणारी नाही. त्यात मनसेचा राजकीय शत्रू शिवसेना हा पालिकेत सत्ताधारी आहे. आपली शिववड्याची योजना ज्यांना पूर्ण करता आली नाही, ते मनसेची योजना गांभीर्याने घेतील याची सुतरामही शक्यता नाही. त्यामुळे जे शिववड्याचे झाले तेच या योजनेचे होणार आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.शिववड्याच्या स्टॉलसाठी शिवसेनेकडे पाच हजार; तर पालिकेकडे दहा हजार बेरोजगारांचे अर्ज निव्वळ धूळ खात पडून आहेत. हे अर्ज म्हणजे बेरोजगारांचे वाढते तांडे दाखविणारी जिवंत उदाहरणे आहेत. शिवसेना किंवा मनसेसारखा कोणताही राजकीय पक्ष असो; त्यांना बेकारांच्या वाढत्या संख्येबद्दल कोणतेही सोयरसुतक नाही. राजकीय पक्षांच्या या हक्काच्या मतपेढ्या असतात. त्यांना नोकऱ्या, स्वयंरोजगारांच्या घोषणांचे गाजर दाखविले की भुरळ पडते. बेरोजगारांना आपल्या भुकेल्या पोटाला फक्त भाकरी मिळवून देणारा रोजगार कळतो. त्यासाठी कुणाचाही झेंडा खांद्यावर घेण्यास, नेत्याचा जयजयकार करण्यास ही रिकामी पोटे आणि रिकामे मेंदू तयार असतात. त्याचा योग्य वापर करण्याचे कसब राजकीय पक्षांनी आत्मसात केलेले आहेच. शिवसेनेने शिवउद्योग सेना काढली. युतीच्या राज्यात 27 लाख बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्याची घोषणा झाली. पुढे या घोषणेतून आणि शिवउद्योगातून किती बेकारांना रोजगार मिळाला? शिवसेनेच्या स्थापनेच्या काळात स्थानीय लोकाधिकार समितीने एअरपोर्ट, बॅंका, पंचतारांकित हॉटेल्स आणि बड्या कंपन्यांना दिलेल्या दणक्यामुळे त्यावेळेस हजारो मराठी तरुणांना रोजगार मिळाला हे वास्तव आहे. पुढे राज्यात युतीची सत्ता असताना बरेच काही करण्यासारखे होते. परंतु पुढे हा करिष्मा टिकू शकला नाही.काळ्या-पांढऱ्या डोळ्यांमध्ये सप्तरंगी स्वप्ने घेऊन जगणारा लाखो-करोडो युवक हा सर्वच राजकीय धुरिणांचा "टार्गेट ग्रुप' आहे. सळसळत्या रक्ताला साद घालण्यासाठी "इमोशनल ब्लॅकमेलिंग' हे खूप सोपे तंत्र आहे. मूळ प्रश्नांचे उत्तर शोधायचे आहे कोणाला? "पदव्यांचे भेंडोळे खायचे कशाशी' हा सवाल करणाऱ्या अनेकांची त्यांच्या प्रश्नाचे उत्तर न देताच "साथ' मिळविणे, हे या तंत्रामागचे खरे "राज' आहे. तरुणाईलाही आपल्या स्वप्नांभोवती रुंजी घालणाऱ्या "स्मार्ट', "बेधडक' नेत्यांची भावनिक गरज असते. त्यामुळेच या साऱ्या विषयाकडे पाहताना हा "सोशियो-पॉलिटिकल' धागा उलगडावा लागतो. इतिहास आठवताना हे नवीन नसल्याचे जाणवू लागते. "गरिबी हटाव'च्या घोषणा दिल्यानंतर किती गरिबी हटली, याची उकल केली तर हाती निराशाच येते. पण, अशा घोषणा सर्वसामान्यांच्या भावविश्वात मोठी जागा व्यापतात, हे मात्र खरे! नेत्यांच्या या क्लृप्त्या आठवून, सामान्यांच्या भावना, एका प्रसिद्ध गजलेत काहीसा बदल करून फार तर असे म्हणता येईल..."आयुष्य तेच आहेअन् हाच पेच आहेनेते भेटती नव्यानेबाकी जुनेच आहे...!- नितीन चव्हाण

Sunday, July 25, 2010
ग्रंथसंपदेसाठी "त्यांनी' पुन्हा घेतली उभारी...
नितीन चव्हाण
ग्रंथ हेच दैवत मानून एखाद्या व्रतस्थाप्रमाणे त्यांची पूजा त्यांनी बांधली होती... आयुष्यभराची सारी मिळकत त्यात ओतली... प्रसंगी पोटाला चिमटा काढून मोठी ग्रंथसंपदा उभी केली... आपल्या स्वप्नाचे सार्थक झाल्याचे वाटत असतानाच मुंबईतील "26 जुलै'च्या पावसाने त्यावर शब्दशः पाणी फेरले... ज्यासाठी आजवर खस्ता खाल्ल्या, तो पुस्तकांचा ठेवाच मातीमोल होतानाचे दुःस्वप्न त्यांना पाहावे लागले... रमेश शिंदे हे त्यांचे नाव. आपण एक लढाई हरतोय, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा उभारी घेत, या पुस्तकांना नवसंजीवनी देण्यासाठी ते सज्ज झाले आहेत... गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलालनगर क्रमांक एकमध्ये राहाणारे रमेश शिंदे आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांच्या संग्रहात इसवीसन 1800 पासूनच्या दोनशे वर्षांतील असंख्य दुर्मिळ पुस्तके, देश-विदेशातील नामवंत लेखक, अभ्यासक, संशोधकांचे ग्रंथ आहेत. सहा ते सात हजार ग्रंथांचा हा ठेवा त्यांनी 50 वर्षे जीवापाड जपला. तीन वर्षांपूर्वी 26 जुलैच्या पावसात तो जवळपास होत्याचा नव्हता झाला. गोरेगावच्या चाळीतील शिंदे यांच्या बैठ्या घरात पावसाचे पाणी दहा-बारा फुटांच्या वर चढले आणि हा संग्रह त्या तडाख्यात सापडला. कथा-कादंबरी, कवितांच्या काल्पनिक जगात रमण्यापेक्षा प्रखर बुद्धिवादाच्या कसोटीवर घासून लखलखीत झालेल्या वैचारिक ग्रंथसंपदेचा ध्यास श्री. शिंदे यांनी घेतला होता. डॉ. आंबेडकरांच्या खासगी संग्रहातील त्यांच्या स्वाक्षऱ्या असलेली असंख्य पुस्तके त्यांच्या संग्रहात आहेत. बाबासाहेबांनी संपादन केलेल्या "प्रबुद्ध भारत', "मूकनायक' यांसह "विविध ज्ञानविस्तार'पासून शंभर वर्षांतील अभ्यासनीय मासिके, विशेषांक, वृत्तपत्रांच्या फायली पावसाच्या तडाख्यात सापडल्या. श्री. शिंदे यांच्या या ग्रंथालयाचा देश-विदेशांतील असंख्य अभ्यासकांना संशोधनासाठी, "पीएचडी'साठी वापर करता आला. ""दुर्दैवाने मला हा संग्रह डोळ्यादेखत पाण्यात जाताना पाहावे लागले. पुढे महिनाभर ते दृष्य वारंवार नजरेसमोर येत होते. अन्नपाणी गोड लागत नव्हते. झोपही उडाली होती...'' रमेश शिंदे सांगत होते. ते पुढे म्हणाले, "शक्य तितकी पुस्तके वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न घरच्यांनी केला. ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांना ही बाब कळताच त्यांनी पुस्तकांची व्यवस्था करण्यासाठी त्वरित एक टेम्पो पाठवून दिला. भिजलेली पुस्तके सुकविण्यासाठी केशव गोरे ट्रस्टच्या बाजूला अंबामाता मंदिरात जागा उपलब्ध करून दिली. तिथे महिनाभर हॅलोजनच्या झोताखाली पुस्तके सुकत होती. त्यातील जवळपास एक हजार पुस्तकांचा अक्षरशः लगदा झाला. उरलेल्या पुस्तकांची स्थिती म्हणावी तितकी धड नाही. अनेकांची मुखपृष्ठे बाद झाली, तर काहींची पाने निखळली आहेत. यातील असंख्य पुस्तकांना बाइंडिंग करायचे आहे. मला जमेल तशी काही बाइंडिंग करून घेतली. मात्र, त्याचा खर्च मोठा आहे. माझ्यासारख्याला तो परवडणारा नाही.' या पुस्तकांचे "मायक्रोफिल्मिंग' करून घेतल्यास तरुण पिढीतील अभ्यासकांना त्याचा वापर करता येईल. त्या दृष्टीने काही करता येईल काय, याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Thursday, June 24, 2010
अब्दुस सत्तार दळवी
ज्येष्ठ उर्दू साहित्यिक, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अब्दुस सत्तार दळवी यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्ली येथील "गालीब इन्स्टिट्यूट'चा मिर्झा गालीब पुरस्कार जाहीर झाला आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते दिल्लीत 11 डिसेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त उर्दू-मराठी भाषाभगिनींच्या आदान-प्रदान प्रक्रियेविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद... मराठी विश्वाचे आर्त उर्दू मनी प्रकाशलेभाषा दोन संस्कृतींना जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नव्हे... भाषिक संस्काराचा हा बंधुभाव सध्याच्या जात-पात, भाषा-प्रांताच्या नावावर चाललेल्या राजकारणात लोप पावत चालला आहे. त्यातही काही माणसे पणती हाती घेऊन भाषाभगिनींत दाटणाऱ्या अंधाराला प्रकाशाच्या वाटा दाखवित असतात. भाषेचा सृजन सोहळा जपत असतात. ज्येष्ठ उर्दू साहित्यिक डॉ. अब्दुस सत्तार दळवी हे त्यापैकी एक आहेत. गेली पाच दशके त्यांनी मराठीतील अभिजात म्हणता येतील अशी काही पुस्तके उर्दूत नेऊन ज्ञानोबा-तुकोबांच्या मराठी विश्वाचे आर्त उर्दूच्या मनी प्रकाशून टाकले आहे.डॉ. दळवी हे कोकणातल्या दापोलीजवळच्या दाभिळ गावचे. उर्दू आणि मराठी ही त्यांची मातृभाषा. कोकणातील बोलीवर "दखनी उर्दू'चा प्रभाव असल्याने दळवींवर उर्दूसोबत दापोली भागातील "बाणकोटी' बोलीचेही संस्कार झाले. या भाषक संकरातून निर्माण झालेल्या "उर्दू-कोकणी' भाषेतील त्यांचे संवाद ऐकणे म्हणजे एक मस्त मैफल असते. त्यात कोकणातील जीवनपद्धती येते. भाषक-धार्मिक संस्कार येतात. गावदेवाची जत्रा येते, उरूस येतो आणि संदलचा ताबूतही नाचत येतो. कुलकर्ण्यांच्या घरातील लग्नाची गोष्ट आणि तांबोळी, दळवी, हुसेन यांच्या "निकाह'तील "बारात'ही येते.1962 मध्ये "अंजुमन इस्लाम'च्या उर्दू इन्स्टिट्यूटमध्ये "उर्दू-दखनी'वरील व्याख्यानमालेत ख्यातनाम इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी यांचे भाषण होते. आपल्या भाषणात पगडी यांनी "उर्दूतून मराठीत बरेचसे साहित्य आले, मात्र मराठीतून उर्दूत फारसे गेलेले नाही' अशी खंत व्यक्त केली. पगडींच्या या वाक्याचा डॉ. दळवींवर प्रभाव पडला. त्यांनी मुंबईत जामा मशिदीच्या ग्रंथालयात जाऊन दर्जेदार उर्दू साहित्याचा शोध घेतला असता त्यांना 1750 मध्ये प्रसिद्ध झालेली शाह तुराब चिश्ती यांची रामदास स्वामींच्या "मनाचे श्लोक'ची "मन समझावन' ही मराठीतून उर्दूत अनुवाद केलेली प्रत सापडली. हा ग्रंथ वाचून त्यांनी रामदास आणि रामदासी परंपरा, रामदासांची काव्ये, समकालीन संतकाव्ये यांचा अभ्यास करून "मन समझावन'ची नवीन संपादित आवृत्ती 1964 मध्ये प्रकाशित केली. हा ग्रंथ पाहून पगडी यांनी डॉ. दळवींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत भाषा आदान-प्रदानाची ही प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यास सांगितले. पगडी यांच्या शाबासकीने माझा आत्मविश्वास दुणावल्याचे डॉ. दळवी सांगतात."ईस्माईल युसुफ'मध्ये शिक्षण घेत असताना पु. शि. रेगे हे आमचे प्राचार्य होते. त्यांच्या "सावित्री' कादंबरीला उर्दूत नेण्याची त्यांनी परवानगी दिली. पुढे त्याच्या "अवलोकिता' या आणखी एका कादंबरीचा अनुवाद मी केला. वसंत बापट यांना हे समजताच त्यांनी विश्राम बेडेकरांच्या "रणांगण'चा अनुवाद का करीत नाहीस असे मला खडसावले. बापटसरांचा आदेश शिरसांवद्य मानीत "रणांगण'ही पूर्ण झाले. ही कांदबरी अनुवादित करताना उर्दू वाचकांना कादंबरीतील सौंदर्यस्थळे, बॉब-हार्टाची हळुवार प्रेमकहाणी समजावून देणे ही कसोटी होती. मात्र उर्दू भाषेला नैसर्गिकच काव्यात्मक लय व आदबशीर नजाकत असल्याने अनुवाद करणे कठीण गेले नाही. ख्यातनाम उर्दू शायर कवी इक्बाल यांनी "जावेदनामा' या आध्यात्मिक अनुभूती देणाऱ्या पर्शियन ग्रंथात "जन्नत'मध्ये संस्कृतचे भाष्यकार "भृतहरी' भेटत असल्याचा संदर्भ दिला आहे. भृतहरींच्या विद्वत्तेने भारावून गेलेल्या डॉ. दळवी यांनी भृतहरींच्या अभिजाततेचा शोध घेत निवडक 200 श्लोकांचा अनुवाद केला. त्याला भाषाशास्त्राच्या अभ्यासात मास्टरपीस म्हणून मान्यता मिळाली आहे.संत ज्ञानेश्वर आणि त्यांची काव्यरचना जगभरातील सर्वभाषक अभ्यासकांना खुणावत असते. डॉ. दळवींना ज्ञानेश्वरांच्या "पसायदान'मध्ये कुराणातील साम्यस्थळे आढळली. विश्वाचे आर्त सांगणाऱ्या सर्व धर्मांच्या समानतेचे गोडवे गाणाऱ्या "पसायदान'ला त्यांनी उर्दूत नेले. उर्दूत त्यानंतर "पसायदान'वर अनेक मान्यवरांनी लिहिले. अली सरदार जाफरी यांनीही दळवींच्या या प्रयत्नाला आपने बहुत बडा काम किया है... अशी मनसोक्त दाद दिली. दळवींनी 1962-63 मध्ये लंडनला जाऊन ध्वनीशास्त्र व भाषाशास्त्राचा अभ्यास केला. भारतात परत आल्यानंतर भाषाशास्त्रावर पीएचडी केली. उर्दू भाषा आणि सामाजिक संदर्भ, भाषकीय संशोधन ही दोन पुस्तके लिहिली. भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये उर्दूत एम.ए.ला अभ्यासग्रंथ म्हणून हे पुस्तक लावण्यात आले आहे. "पुण्याचे मुसलमान', "कोकणातील मुसलमान' या स्वतंत्र पुस्तकांतून त्यांनी मुस्लिमांचे शिक्षण, ग्रंथवाचन, राहणीमान, जीवनपद्धती, मुशायरे, साहित्य, चित्रपटसृष्टी असा विविधांगी वेध घेतला आहे. जयवंत दळवींचे "बॅरिस्टर', कुसुमाग्रजांची "वीज म्हणाली धरतीला'चे त्यांचे अनुवाद चर्चेत राहिले आहेत. "बॉम्बे की उर्दू'मधून त्यांनी "बम्बैया पर्शियन उर्दू'वर प्रकाश टाकला आहे. उर्दूतील नवीन साहित्य निर्मितीबद्दल मात्र डॉ. दळवी तितकेसे समाधानी नाहीत. नव्या पिढीतील लेखकांचा कल शायरी आणि लघुकथांकडे अधिक असल्याचे मत ते व्यक्त करतात. सामाजिक, ऐतिहासिक, भाषाशास्त्र, तत्त्वज्ञान अशा गंभीर विषयांकडे ते मोठ्या प्रमाणात वळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सध्याच्या भाषा-प्रांतवादाच्या राजकारणावर दळवी यांच्यातील लेखक अस्वस्थ होते. ते म्हणतात भाषेच्या नावाखाली चाललेले हे प्रकार दुदैवी आहेत. भाषा हे संवादाचे माध्यम आहे वादाचे नव्हे. भाषेवरून चालणारा संघर्ष म्हणजे गर्मी जादा है रोशनी कम है... या वर्गातला आहे. आपण जर्मन, फ्रेन्च भाषा आपण शिकतो पण मुलांना मराठी शाळेत घालण्याची आपल्याला लाज वाटते. दुसऱ्यांच्या भाषा शिकल्याच पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या मातृभाषेचा मात्र विसर पडता कामा नये अशा अधिकारवाणीने ते सांगायला विसरत नाहीत.
Subscribe to:
Posts (Atom)